ठळक बातम्या

    राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बदल; विदर्भातील शाळा २२ जूनपासून, उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून सुरू

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. शिक्षण संचालनालयाने ९ जून २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील बहुतांश शाळा सोमवार, १५ जून २०२६ पासून नियमित वेळेत सुरू होणार आहेत.

    मात्र, विदर्भातील वाढत्या तापमानाचा विचार करून त्या विभागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार, २२ जून २०२६ पासून सुरू होतील.

    तसेच २२ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार असून, १ जुलै २०२६ पासून शाळा नियमित वेळेत सुरू होतील.

    या संदर्भात शिक्षण संचालनालयाने संबंधित सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. विदर्भातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

    उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शाळा सुरू करण्याच्या तारखेबाबत दाखल करण्यात आलेल्या न्यायालयीन याचिका तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालनालयाने दिली आहे.




    Photo