ठळक बातम्या

    "एका रात्रीत निर्गुडा नदीचे पाणी गायब! नगरपरिषदेच्या नियोजनावर वणीकरांचा संताप"

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : 23 जून रोजी झालेल्या पहिल्याच दमदार पावसानंतर वणी शहराची जीवनदायिनी निर्गुडा नदी दुथडी भरून वाहू लागली होती. नदीवरील बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. नदीप्रेमी आणि निर्गुडा परिवारातील सदस्यांनी नदीत पोहण्याचा आनंद घेत स्वच्छता अभियानही राबविले होते.

    मात्र, अवघ्या एका दिवसातच परिस्थिती पूर्णपणे बदलली. दिनांक 24 जून रोजी सकाळी बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी 25 जून रोजी सकाळी अचानक गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कालपर्यंत प्रवाही असलेली निर्गुडा नदी आज नाल्यासारखी दिसत असल्याने नागरिकांनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे.

    नियमितपणे नदीवर जाणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी धरणातून पाणी सोडल्यास किंवा पावसामुळे नदी भरल्यास ते पाणी किमान चार ते पाच दिवस तरी नदीपात्रात टिकून राहत असे. मात्र यावेळी पाणी इतक्या वेगाने नाहीसे होण्यामागे नगरपरिषद प्रशासनाचे चुकीचे नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

    नदीवरील बंधाऱ्यांची देखभाल, गाळ काढणे, पाणी अडविण्याची व्यवस्था आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे निर्गुडा नदीचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची भावना वणीकर व्यक्त करीत आहेत. "पाणी अडवा, पाणी जिरवा" असा संदेश शासन देत असताना वणीतील प्रशासन मात्र जनतेलाच जिरवत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

    निर्गुडा नदी ही वणी शहराची जीवनवाहिनी असून तिचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन नदीतील पाणी टिकविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वणीकर नागरिकांनी केली आहे.

    निर्गुडा नदीचे नैसर्गिक सौंदर्य आणि अस्तित्व कायम राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात ही नदी केवळ नावापुरतीच उरेल, अशी खंत नदीप्रेमींनी व्यक्त केली आहे.



    Photo