ठळक बातम्या

    पहिल्याच दमदार पावसाने निर्गुडा माय झाली दुथडी भरून; निर्गुडा परिवाराचा जल्लोष, स्वच्छता अभियानही राबविले

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : दिनांक २३ जून रोजी झालेल्या यंदाच्या पहिल्याच दमदार पावसाने वणी शहराची जीवनदायिनी असलेली निर्गुडा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली. अनेक दिवसांपासून कोरडे पडलेले नदीपात्र पावसाच्या पाण्याने भरून गेल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

    निर्गुडा नदीला पाणी आल्याची माहिती मिळताच निर्गुडा परिवाराच्या सदस्यांनी नदीकाठ गाठत या आनंदाचा उत्स्फूर्त जल्लोष साजरा केला. सदस्यांनी नदीच्या स्वच्छ व प्रवाही पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव घेतला. यावेळी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती दिसून आली.

    केवळ आनंदोत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता, निर्गुडा परिवाराच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत नदीपात्रात स्वच्छता अभियान देखील राबविले. नदीकाठावरील प्लास्टिक, कचरा व इतर घातक वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. "नदी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे," असा संदेश यावेळी सदस्यांनी दिला.

    पहिल्याच जोरदार पावसामुळे निर्गुडा नदीला नवसंजीवनी मिळाल्याने शेतकरी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नदीतील पाण्याचा वाढलेला प्रवाह आणि हिरवागार होत असलेला परिसर पाहून वणीकरांना आगामी पावसाळ्याबाबत आशावाद निर्माण झाला आहे.

    यावेळी निर्गुडा परिवाराच्या सदस्यांनी नागरिकांना नदी व पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वच्छता, वृक्षारोपण आणि जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

    Photo