विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी,यवतमाळ : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत वणी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीकडे अपील सादर केले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक तथा समितीचे सदस्य सचिव मनोज ढगे यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी केली.
निवेदनानुसार, वणी तालुक्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीनचे 3,366, कापसाचे 7,830 आणि तुरीचे 1,865 असे एकूण 13,069 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिस्स्यापोटी सुमारे 1 कोटी 11 लाख 55 हजार 845 रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते. मात्र अतिवृष्टी, सततचा पाऊस, वर्धा, पैनगंगा व निर्गुडा नद्यांना आलेला पूर तसेच पाणथळ परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.
याप्रकरणी तालुकास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. दिनांक 8 मे 2026 रोजी तहसीलदार वणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विमा कंपनीला YES-TECH आधारित उत्पादन आकडेवारी, सॅटेलाईट प्रतिमा, गणना पत्रके व इतर तांत्रिक अभिलेख 20 मे 2026 पर्यंत समितीसमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत विमा कंपनीने कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
विजय पिदुरकर यांनी जिल्हास्तरीय समितीकडे महसूल मंडळनिहाय NDVI, NDWI, VCI, TCI, VHI, EVI यांसारख्या निर्देशांकांवर आधारित उत्पादन आकडेवारी व सॅटेलाईट माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच विमा नुकसान भरपाई नाकारण्याची कारणे मंडळनिहाय व बाबनिहाय लेखी स्वरूपात शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश विमा कंपनीला द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शासन निर्णयातील तरतुदीनुसार YES-TECH आधारित आकडेवारी वेळेत उपलब्ध न झाल्यास पीक कापणी प्रयोगातून मिळालेली उत्पादन आकडेवारी ग्राह्य धरण्याची तरतूद आहे. वणी तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्याने पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी पिदुरकर यांनी केली आहे.
या अपीलाची सुनावणी घेऊन संबंधित विमा कंपनीविरोधात आवश्यक आदेश व निर्देश जारी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.



