ठळक बातम्या

    जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील ३० वृक्षतोडीला पत्रकार संघटनेचा तीव्र विरोध

     'विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी नको'; नगर परिषदेला आक्षेप अर्ज सादर

    वृक्षतोडीचा निर्णय स्थगित करण्याची मागणी; पर्यायी जागेचा पर्यायही सुचविला

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : नगर परिषद वणीच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील ३० वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाला न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन, वणीने तीव्र विरोध दर्शविला असून याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना सविस्तर आक्षेप अर्ज सादर करण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रस्तावित वृक्षतोड तत्काळ स्थगित करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

    नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यानुसार जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील कडूलिंब, आवळा, आंबा, वड, जांभूळ, करंजी, अशोक, औदुंबर, रामफळ, आपटा आदी विविध प्रजातींची एकूण ३० झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र ही झाडे अनेक वर्षांपासून परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असून शहराच्या या भागासाठी ‘ऑक्सिजन हब’ म्हणून काम करतात, असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

    संघटनेने मांडलेल्या आक्षेपांमध्ये या झाडांवर अनेक स्थानिक तसेच दुर्मिळ पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले आहे. वृक्षतोड झाल्यास पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होईल तसेच परिसरातील तापमान वाढून हिरवळ कमी होण्याचा धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

    याशिवाय, जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी वृक्षतोड हाच एकमेव पर्याय नसून प्रकल्पाच्या आराखड्यात आवश्यक बदल करून झाडे वाचविणे शक्य असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगर परिषदेकडे दूरदर्शन केंद्रामागील जागा, नगर परिषद शाळा क्रमांक ३ मागील जागा यासह इतर पर्यायी जागा उपलब्ध असल्याने त्यांचा विचार करण्याची मागणी करण्यात आली.

    या आक्षेपावर अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही वृक्षतोड करू नये तसेच पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करून विकासकामे राबवावीत, अशी विनंती संघटनेने केली आहे.

    निवेदन सादर करताना संघटनेचे अध्यक्ष दिपक छाजेड, उपाध्यक्ष इक्बाल शेख, सचिव परशुराम पोटे, सहसचिव निलेश चौधरी, कोषाध्यक्ष प्रविण शर्मा यांच्यासह ज्ञानेश्वर बोनगीनवार, विशाल ठोंबरे, नरेंद्र लोणारे, महादेव दोडके, मारोती मडकाम, पुरुषोत्तम नवघरे, संजय चिंचोलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.




    Photo