विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलिस दलाने जिल्हा ड्रग्जमुक्त करण्याच्या उद्देशाने ड्रग्जविरोधात व्यापक 'महाऑपरेशन' हाती घेतले असून अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५१ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५१ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली आहे. त्यामध्ये यवतमाळ शहरात सर्वाधिक २९ गुन्हे, पुसद येथे १५, उमरखेड येथे ६, वणी येथे ६, दारव्हा येथे १ आणि पांढरकवडा येथे २ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र ड्रग्जविरोधी पथक कार्यरत करण्यात आले असून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष भर दिला जात आहे. जिल्ह्यात नशामुक्ती केंद्र सुरू करण्याचा निर्णय, १५ विभागांच्या संयुक्त टास्क फोर्सची स्थापना, ड्रग्ज तस्करांची माहिती देणाऱ्यांना आर्थिक बक्षीस तसेच माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्याची हमी देण्यात आली आहे.
तसेच संशयास्पद हालचाली किंवा ड्रग्ज तस्करीबाबतची माहिती नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा डायल ११२ वर देण्याचे आवाहन यवतमाळ पोलिसांनी केले आहे.
यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या या निर्णायक मोहिमेमुळे जिल्हा ड्रग्जमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
