ठळक बातम्या

    वणी पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी; दिंडी, अभंग, भारूड व सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव जागवला

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : वणी पब्लिक स्कूल येथे शनिवार (दि. २५ जुलै) रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून आकर्षक दिंडी काढली. टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

    कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेवर आधारित अभंग, भारूड, भजन तसेच आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणारी मनोगते सादर केली. काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

    यावेळी मुख्याध्यापक श्री. सतिष बावस्कर यांनी विद्यार्थ्यांना संत विचारांचे महत्त्व, सदाचार, सेवा, समता आणि भक्तीचा संदेश दिला. तर उपमुख्याध्यापिका सौ. आश्लेषा जेनेकर यांनी वारकरी परंपरा, संत साहित्य आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोषी ताजणे, मानसी कोरडे, रविना दादेवार, वनीता एनपोतवार, शुभ्रा मत्ते, आरोही तुराणकर ,यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जानवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी आरोही तुराणकर हिने केले.

    या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, संत साहित्य आणि भारतीय संस्कृतीविषयी आदरभाव निर्माण झाला.वंदना बाविस्कर व एकता गौरकार यांनी पसायदान गावून कार्यक्रमाची सांगता केली.



    Photo