विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शिंदोला–येनक–साखरा–जुगाद एम.टी.डी.आर.-७९ या रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचा निषेध केला. रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे तीन महिने उलटले असतानाच आदर्श हायस्कूल ते शेवाळा फाटा तसेच कोलगावजवळील रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात आयुष रोहिदास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मा. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा यांना मा. उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग, वणी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले असता मा. उपविभागीय अभियंता कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी बांधकाम प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर उपविभागीय अभियंता कार्यालयात उपस्थित झाले आणि त्यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
शिंदोला–येनक–साखरा या रस्त्याचे काम बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, यवतमाळ यांना देण्यात आले असून, रस्त्याचे काम निर्धारित कालावधी व करारातील अटींनुसार करण्यात आले नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
या रस्त्याच्या कामासंदर्भात यापूर्वीही दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निवेदन देण्यात आले होते. रस्त्याच्या कामामुळे मार्गावरील अपघातांचा धोका वाढला होता. तसेच रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना धुळीचा त्रास आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.
मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच रस्त्यावर ठिकठिकाणी खराबी निर्माण झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून शेड्युल डिझाईन, रस्त्याचे डिझाईन, पुलिया डिझाईन तसेच करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार काम करण्यात आले आहे की नाही, याची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच ज्या ठिकाणी निकृष्ट बांधकाम झाले आहे, ते बांधकाम काढून गुणवत्तापूर्ण व पूर्ववत दर्जाचा रस्ता करून देण्यात यावा, संबंधित कामाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी आणि दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
“नागरिकांच्या करातून रस्त्याची कामे केली जातात. त्यामुळे रस्ता काही महिन्यांतच खराब होत असेल तर संबंधित कामाच्या गुणवत्तेची चौकशी होणे आवश्यक आहे. प्रशासनाने नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये,” अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली.
प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची पाहणी करून निकृष्ट काम दुरुस्त केले नाही, तर दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी उपस्थिती आयुष रोहिदास ठाकरे, अजिंक्य शेंडे, भगवानं मोहिते प्रणय बदखल, रवी वाटेकर, कार्तिक आत्राम, लता ठावरी, दादु गोरे, अनिकेत बलकी, पियुष हजारे, प्रवीण डोहे तसेच सुदर्शन शिंदे यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.




