ठळक बातम्या

    *वडगाव टीप येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा* बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन, झेंडावंदन व वृक्षारोपण

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त वडगाव टीप येथे बिरसा मुंडा विचार मंचच्या वतीने विविध उपक्रमांसह कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून कार्यक्रमातून समाजाच्या एकजुटीचा संदेश देण्यात आला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिरसा मुंडा विचार मंचचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सालूरकर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन केले.

    यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणही करण्यात आले. आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते जपत पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी अधोरेखित केले.

    कार्यक्रमाला लहानू सालूरकर, गंगाधर गेडाम सर, आनंदराव सालूरकर, जनार्दन परचाके, गोपाल बोरकर, संजय सालूरकर, भारत गेडाम, शंकर परचाके, बबलू सालूरकर, साहील किनाके, नामदेव गेडाम, पंढरी सालूरकर, नंदू सालूरकर, सारंग सालूरकर यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती.

    जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाची अस्मिता, संस्कृती व परंपरा जपण्यासोबतच जल, जंगल आणि जमिनीच्या संवर्धनासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

    Photo