विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
चंद्रपूर : वन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ७५ वर्षांवरील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात १० हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल सेवानिवृत्त मुख्य लेखापाल रवींद्र सागीवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांच्या मार्गदर्शनामुळे सेवानिवृत्तीनंतरही अनेक वर्षांपासून जुने सहकारी एकत्र येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चंद्रपूरप्रमाणेच गडचिरोली व आलापल्ली येथेही अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते.
वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष किशोर पोहणकर यांनी संघटनेच्या प्रवासावर प्रकाश टाकताना कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. सहकार्याच्या भावनेतून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासह नवीन पदे निर्माण करण्यासाठीही संघटनेचा उपयोग होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सेवानिवृत्त मुख्य लेखापाल भैयाजी रोहणकर यांनी स्नेहसंमेलनामागील भूमिका स्पष्ट करताना, अनेक जुने सहकारी एकमेकांच्या संपर्कात राहिलेले नाहीत. त्यामुळे एकमेकांच्या गाठीभेटी होऊन नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मैंद यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन बबन राखुंडे यांनी केले. स्नेहसंमेलनाला विविध भागांतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

