ठळक बातम्या

    *पंचशील चौक–ब्राह्मणी फाटा रस्त्याची दुरवस्था;* *१५ दिवसांत काम सुरू न झाल्यास रास्ता रोकोचा शिवसेना (उबाठा )चा इशारा*

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : दि. २४ ऑगस्ट २०२६ : वणी शहरातील पंचशील चौक ते ब्राह्मणी फाटा हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मुख्य रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, पादचारी तसेच वे को ली कडे जाणारे कर्मचारी ये-जा करीत असतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

    पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार व इतर वाहनचालकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. रुग्णालये, शाळा आणि शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वणी शहर प्रमुख विनोद मनोहरराव ठुमणे यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन पंचशील चौक ते ब्राह्मणी फाटा या संपूर्ण रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे बुजविणे, आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करणे आणि रस्त्याचे दर्जेदार नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे.

    येत्या १५ दिवसांच्या आत प्रत्यक्ष रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

    आंदोलनामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी अथवा इतर परिस्थितीस नगरपरिषद प्रशासनाचा विलंब व उदासीनता सर्वस्वी जबाबदार राहील, याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही ठुमणे यांनी स्पष्ट केले आहे.

    नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न असल्याने केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याचे दर्जेदार व टिकाऊ नूतनीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उबाठाच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी शहर प्रमुख विनोद ढुमणे यांच्यासह 

    नगरसेवक  सुधीर थेरे,   नगरसेवक गुलाम रंगरेज, नगरसेवक शत्रुघ्न मालेकर, नगर शेवकर अनिकेत बदखल , नगरसेवक अजय धोबे, मोरेश्वर उज्वलकर, राजीव पाटील, किशोर गोहोकार, मनिश बतरा, अजय चन्ने,, युवा सेना शहर प्रमुख तुलसी तेवर,नितीन रामगिरवार, शंकर देरकर, कसाबीर भाई, पांडूरंग पोतराजे,गजानन बरडे,

     पंकज आवारी,राहुल धानोरकर,वैभन गायकवाड यांची उपस्थिती होती.

    Photo