विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शिंदोला–येनक–साखरा–जुगाद एम.टी.डी.आर.-७९ या रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात आज दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी शिंदोला चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे तीन महिने उलटत नाहीत तोच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून डांबरीकरण उखडल्याने रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे. या निकृष्ट कामाविरोधात नागरिक व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचा तीव्र निषेध केला.
आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक रोखून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
आयुष रोहिदास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करून दर्जेदार व टिकाऊ रस्ता करून द्यावा, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी तसेच दोषी अधिकारी व ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंतनू दुधाडे हे आंदोलनस्थळी उपस्थित झाले. यावेळी आंदोलकांनी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबतच्या प्रमुख मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.
त्यानंतर कार्यकारी अभियंता शंतनू दुधाडे यांनी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या. संबंधित कामाबाबत आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
यामध्ये संबंधित कामाबाबत एस.डी. व एफ.डी. रिलीज करण्याबाबत कार्यवाही, संबंधित ठेकेदाराच्या कामाबाबत ब्लॅकलिस्ट करण्याची कार्यवाही, तसेच रस्त्याच्या कामासाठी आवश्यक मशिनरी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले.
तसेच पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे काम पुन्हा सुरू करून आवश्यक त्या ठिकाणी दर्जेदार काम करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून लेखी स्वरूपात स्पष्ट करण्यात आले.
या रस्त्याच्या कामासंदर्भात यापूर्वीही दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास, अपघातांचा धोका तसेच रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना होणाऱ्या धुळीच्या त्रासाबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच रस्त्याची दुरवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.आंदोलकांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या करातून होणाऱ्या विकासकामांमध्ये निकृष्टपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने लेखी स्वरूपात मान्य केलेल्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करून प्रत्यक्षात दर्जेदार व टिकाऊ रस्ता करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
कार्यकारी अभियंता यांनी प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आयुष रोहिदास ठाकरे, बाबाराव ठाकरे, अजिंक्य शेंडे, अनिल तेलंग, दशरथ पाटील, समीर बांदुरकर, प्रणय बदखल, लता ठावरी, कविता पूरठकर, दादाराव आसूटकर (महाराज), नयनपाल मडावी, कुणाल गोहकार, धनराज भाळणे, नितीन गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.


