ठळक बातम्या

    निर्गुडा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी हालचालींना वेग; आमदार सुधीर मुनगंटीवार यांची जलसंपदा मंत्र्यांकडे निधीची मागणी

     खोलीकरण, गाळ काढणे, तटसंरक्षण व सौंदर्यीकरणासाठी सविस्तर DPR तयार करण्याची मागणी

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : वणी तालुक्यातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीच्या खोलीकरण, पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणासाठी आता शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी या संदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. त्याची दखल घेत आमदार मुनगंटीवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

    निर्गुडा नदी ही वणी तालुक्यातील शेती, नागरी व ग्रामीण भागासाठी महत्त्वाची जलवाहिनी असून तिचे धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्वही असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. वणी परिसरातील श्री रामेश्वर स्वामी मंदिर तसेच महादेव मंदिर परिसरातून नदी वाहत असल्याने नदीला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

    मात्र, नदीपात्रात अनेक ठिकाणी गाळ व माती साचली असून पात्र उथळ झाले आहे. जलपर्णी व इतर जलवनस्पतींच्या वाढीमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होत आहे. परिणामी पावसाळ्यात पुराचा धोका वाढण्याबरोबरच नदीची जलधारण क्षमता कमी होत असून पावसाचे पाणी साठवण आणि भूजल पुनर्भरणावरही विपरीत परिणाम होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

    या पार्श्वभूमीवर शास्त्रीय पद्धतीने नदीचे खोलीकरण, गाळ काढणे, आवश्यक ठिकाणी नदीपात्राचे रुंदीकरण, तटसंरक्षण, वृक्षारोपण, जलसंधारण व सौंदर्यीकरण करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. या संपूर्ण कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून त्यामध्ये नदी पुनरुज्जीवन, जलसंधारण, तटसंरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सौंदर्यीकरणाचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    निर्गुडा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक निधी जिल्हा खनिज विकास निधी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या उपलब्ध निधीतून उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून शिफारस करावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे.

    नदीचे पुनरुज्जीवन झाल्यास शेती, पशुधन, भूजल पातळी, पर्यावरण संवर्धन तसेच वणी शहराच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे शासन या मागणीवर कोणती कार्यवाही करते, याकडे वणी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    Photo