शांतता समितीच्या बैठकीतील शब्द पाळला; अवघ्या तीन तासांत ३० जनावरे कोंडवाड्यात
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून चौकाचौकात तसेच प्रमुख रस्त्यांवर जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समितीच्या सदस्यांनी शहरातील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
या सूचनेची दखल घेत वणी नगर परिषदेने तात्काळ सूत्रे हलविली. बैठकीनंतर अवघ्या तीन तासांतच, शुक्रवारी रात्री नगर परिषदेच्या पथकाने शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर मोहीम राबवून तब्बल ३० मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात दाखल केली.
नगर परिषदेने शांतता समितीच्या बैठकीतील सूचनांची तातडीने अंमलबजावणी करत मोकाट जनावरांविरोधात मोहीम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळातही ही मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

