ठळक बातम्या

    सणोत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन; वणी पोलिसांतर्फे शांतता समितीची बैठक

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : आगामी ईद-ए-मिलाद, गोकुळ अष्टमी आणि पोळा या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्व सण उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावेत, यासाठी वणी पोलिस स्टेशनमध्ये २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

    या बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, ठाणेदार भानुदास पिदुरकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक नरेश रणधीर, नगरपरिषदेचे प्रतिनिधी गडलिंग आदी उपस्थित होते.

    यावेळी ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजबांधवांनी आपापले सण शांततेत व बंधुभावाने साजरे करावेत, असे आवाहन केले. सणोत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी सर्वांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

    बैठकीदरम्यान शांतता समितीचे सदस्य नारायण गोडे, मंगल तेलंग, प्रा. पुरुषोत्तम पाटील, रज्जाक पठाण यांनी सणोत्सवाच्या काळात निर्माण होऊ शकणाऱ्या विविध समस्यांबाबत सूचना मांडल्या. यावर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांनी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.

    या बैठकीला शांतता समितीचे सदस्य तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Photo