ठळक बातम्या

    वणी पब्लिक स्कूलमध्ये व्यसनमुक्त भारत अभियानाचे आयोजन

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करून निरोगी व सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्याच्या उद्देशाने वणी पब्लिक स्कूलमध्ये १८ ऑगस्ट रोजी व्यसनमुक्त भारत अभियानाचे आयोजन करण्यात आले. प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

    कार्यक्रमाला सेवानिवृत्त विस्तार अधिकारी रमेश बोबडे, सेवानिवृत्त तहसीलदार चरणदासजी कोंडावार, रंजनाताई येरणे, विलासजी दखने, श्री छत्रपती शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे प्राचार्य अभय पारखी तसेच वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य सतीश बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी रमेश बोबडे यांनी व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. निरोगी जीवनशैली, चांगल्या सवयी आणि सकारात्मक विचारांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

    सेवानिवृत्त तहसीलदार चरणदासजी कोंडावार यांनी व्यसनाधीनतेचे व्यक्तीच्या आरोग्यासोबतच कुटुंब आणि समाजावर होणारे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले. व्यसनापासून दूर राहून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजनाताई येरणे यांनी केले. संचालन मानसी कोरडे यांनी, तर आभार प्रदर्शन रवीना दादेवार यांनी केले. रोहिणी लोणकर यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यास मोठी मदत झाली.

    Photo