विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
मारेगाव : दि. १८ ऑगस्ट २०२६ आरोग्य ही प्रत्येक कुटुंबाची सर्वात मोठी संपत्ती आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही नागरिकाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या महाआरोग्य शिबिरामागचा मुख्य हेतू आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित हे शिबिर केवळ आरोग्य तपासणीचे आयोजन नसून, ‘सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सदैव सोबत उभे राहणे’ या बाळासाहेबांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करणारा उपक्रम आहे. मारेगाव आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा लोकाभिमुख उपक्रमांची मालिका यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे प्रतिपादन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मारेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरादरम्यान बोलताना आमदार संजय देरकर यांनी वरील प्रतिपादन केले.
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी (मेघे) आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने, प्राथमिक आरोग्य केंद्र मारेगावच्या विशेष सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मारेगाव येथे हे शिबिर पार पडले. आमदार संजय देरकर यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात तब्बल २ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या महाआरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले होते. नेत्ररोग, मेडिसिन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, श्वसनरोग, त्वचारोग तसेच मुखरोग आदी विभागांमध्ये नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच ईसीजी, मॅमोग्राफी, रक्तदाब, रक्तशर्करा यांसह आवश्यक प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. गरजेनुसार रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
भरती होणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक सामान्य तपासण्या, औषधोपचार, भोजन तसेच रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र असलेल्या रुग्णांना उपचार विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच आशा सेवकांचा सत्कार करण्यात आला त्यांना थंड पाण्याची बॉटल भेट देण्यात आली शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
या शिबिराला यवतमाळ शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संजयजी निखाडे, तहसीलदार निलावाड , गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, मारेगाव नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, महिला जिल्हाप्रमुख डिमानताई टोंगे, जिल्हा संघटक गणपतजी लेडांगे, किरणताई देरकर, वणी विधानसभा प्रमुख सुनिल कातकडे, माजी नगराध्यक्ष इंदुताई किन्हेकर, जिनाताई वरारकर, नगरसेविका वर्षाताई किंगरे, सुरेखाताई ढेंगळे, वैशालीताई देठे, सविताताई आवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मडावी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. इंगळे, डॉ. शशांक घोटकर, डॉ. प्रिया गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी शिवसेना उबाठा तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, अभय चौधरी, बदरुधीन काजी, देवा बोबडे नगरसेविका वर्षा किंगरे, मालाताई बदकी, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी आमदार संजय देरकर यांनी या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून मारेगाव परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि तज्ज्ञ आरोग्यसेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सांगितले. आरोग्य सेवा हीच खरी लोकसेवा असल्याचे सांगत आमदार देरकर पुढे म्हणाले की, “मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ आरोग्यसेवा ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. एका छताखाली हजारो नागरिकांची तपासणी होणे आणि गरजू रुग्णांना पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध होणे, ही या शिबिराची सर्वात मोठी फलश्रुती आहे.”
दरम्यान, सकाळपासूनच शिबिरस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाचा लाभ घेतला. २ हजार नागरिकांची तपासणी झाल्याने या महाआरोग्य शिबिराला मिळालेला प्रतिसाद त्याच्या लोकाभिमुखतेची साक्ष देणारा ठरला. “सेवा, संवेदना आणि समर्पण” या त्रिसूत्रीवर आधारित या महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानले.



