तंबाखूविक्रीवर कायदेशीर कारवाई; शाळा-महाविद्यालय परिसरात पोलिसांचा वॉच
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
यवतमाळ : विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी आणि शाळा-महाविद्यालयांचा परिसर नशामुक्त ठेवण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. शैक्षणिक परिसराच्या आसपास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानठेले व दुकानदारांवर कारवाई करत पोलिसांनी व्यसनमुक्तीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यास सुरुवात केली आहे.
“नशामुक्त युवा – सुरक्षित समाज” या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या अभियानात पालक, शिक्षक, विद्यार्थी, दुकानदार तसेच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी पोलिसांकडून नियमित पाहणी आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभियानादरम्यान ३१० जणांवर कायदेशीर कारवाई करून तंबाखू विक्रीला आळा घालण्यात आला, तर २५० पानठेले शैक्षणिक परिसरातून हटविण्यात आले. तसेच ९१२ शाळा-महाविद्यालयांच्या परिसराला तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य व्यसनापासून सुरक्षित ठेवणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून पालक, शिक्षक, दुकानदार आणि संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शाळा-महाविद्यालयांच्या आसपास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा सक्षम नागरिक. त्याला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला, तरच नशामुक्त आणि सुरक्षित समाजाची निर्मिती शक्य आहे,” असा संदेश या अभियानातून देण्यात आला आहे.

