ठळक बातम्या

    धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न ऐरणीवर; कवडशी जि.प. शाळेसाठी नव्या इमारतीची मागणी

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : तालुक्यातील कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्गखोल्या अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धोकादायक वर्गखोल्यांच्या ठिकाणी नवीन दोन वर्गखोल्या मंजूर करून बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानचे सदस्य विजय पिदूरकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कवडशी येथील प्राथमिक शाळेच्या दोन वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या योग्य नसल्याची बाब शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

    गेल्या अनेक महिन्यांपासून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी संबंधितांकडे सातत्याने मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

    कवडशी गाव हे खाणबाधित क्षेत्रात येत असल्याने जिल्हा खनिज विकास निधीतून शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या शाळेत असलेल्या अपुऱ्या व धोकादायक वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत असून प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

    “विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको; कवडशी शाळेच्या दोन धोकादायक वर्गखोल्यांचे तातडीने बांधकाम करा,” अशी ठाम मागणी विजय पिदूरकर ,महादेव आंनंदराव दातारकर,सौ. वंदना भास्कर कावडे,सौ संध्या विठ्ठल दुमणे,सौ. छाया नरेंद्र चिडे,सुलोचना प्रमोद्‌ बुच्चे,रेश्मा कुपाल वासेकर, विद्या दिनेश थेटे,वनिता दिलीप येसेकर,प्रियंका संदिप भेंजळे,श्री नागोबा सुर्यभान काकडे,संदिप चरणदास इंगोले धनराज बाबुलाल तांदूळकर,अनिल नानानाजी बुच्चे,सुनिल नानाजी बुच्चे, सुरेश बापुराव भेंडाळे ,दत्तु विठ्ठल माहुरे,प्रफुल भगवान टोंगे,हरीदास बापुराव भेंडाडे यांनी केली आहे.

    निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा खनिज प्रतिष्ठान तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती वणी यांनाही देण्यात आल्या आहेत.

    Photo