ठळक बातम्या

    स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी वणीला जाणारी १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; युवकाविरुद्ध अपहरणाचा संशय, मारेगाव पोलिसांत गुन्हा

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     मारेगाव : स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी वणी येथे जाणारी १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना मारेगाव येथे समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एका २५ वर्षीय युवकाविरुद्ध अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला असून, मारेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 140(3) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

    पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, संबंधित तरुणी वणी येथे स्पर्धा परीक्षेच्या क्लासला जात होती. ३ सप्टेंबर रोजी दुपारी तिची आई घरी परतल्यानंतर तरुणी घरात आढळून आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच वणी परिसरातील विविध ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, बराच शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही.

    दरम्यान, तक्रारदार महिलेने एका २५ वर्षीय युवकावर आपल्या मुलीला घरातून घेऊन गेल्याचा संशय व्यक्त केला आहे. यापूर्वीदेखील संबंधित युवकाने मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, त्यावेळी मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

    बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यासाठी मारेगाव पोलिसांकडून तपास सुरू असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे. तरुणीचा शोध आणि प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास करण्यात येत आहे. प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

    Photo