“ढोल-ताशांचा गजर अन् ‘जय श्रीकृष्ण’चा जयघोष; वणीत जन्माष्टमीच्या शोभायात्रेने शहर दुमदुमले!”
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी वणी शहरात भव्य भक्तिमय शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता अमृत भवन येथून सुरू झालेल्या या शोभायात्रेत ढोल-ताशांचा गजर, धुमाळ बँड, डीजेची रोषणाई आणि ‘जय श्रीकृष्ण’च्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले.
वारकरी व पदावली भजन मंडळांची भक्तिगीते, भगवान शंकर-पार्वती, वीर बजरंगबली यांच्यासह विविध देवी-देवतांच्या आकर्षक जिवंत झाक्या, अघोरी तांडव, गोंडी ढेमसा नृत्य, असुरांची झाकी आणि गोरिला यांसारखी विशेष आकर्षणे शोभायात्रेचे केंद्रबिंदू ठरले.
शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या शोभायात्रेचे नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपालांसह हजारो भाविक सहभागी झाल्याने शोभायात्रेला विराट स्वरूप प्राप्त झाले. समितीच्या वतीने भाविकांना फराळ व थंडपेयाचे वाटप करण्यात आले.
मार्गदर्शक विजयबाबू चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष ॲड. कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला. शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.








