विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : तालुक्यातील कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शाळेतील जुन्या व जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कवडशी यांनी पुढाकार घेत जिल्हा प्रशासनाकडे नवीन वर्गखोल्यांची मागणी केली होती.
दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी माजी जि.प. सदस्य विजय पिदुरकर व संबंधित पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. शाळेची एक वर्गखोली कोसळल्याची घटना घडून विद्यार्थ्यांचे जीव थोडक्यात बचावले होते. त्यामुळे उर्वरित धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
कवडशी परिसरातील शाळेसाठी खनिज विकास निधीतून दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर विषय लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी खनिज विकास निधीतून वर्गखोल्यांना मान्यता देण्यात आली आहे.
या मंजुरीमुळे कवडशी येथील विद्यार्थ्यांना लवकरच सुरक्षित, सुसज्ज आणि शैक्षणिकदृष्ट्या योग्य वातावरणात शिक्षण घेता येणार आहे. शाळेच्या वर्गखोल्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
या कामासाठी पाठपुरावा करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कवडशी आणि संबंधित प्रशासनाचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
“खनिज विकास निधी हा आमच्या हक्काचा; तो परिसराच्या विकासासाठीच उपयोगात यावा,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

