विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या स्वागतासाठी वणी शहर पूर्णपणे सज्ज झाले आहे. आज दिनांक १४ सप्टेंबर रोजी वणी शहरासह तालुक्यात मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात श्री गणरायाची स्थापना होत आहे.
गेल्या ८-१० दिवसांपासून गणेश मंडळे आणि नागरिकांच्या घरी बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू होती. आज सकाळपासूनच बाजारपेठेत पूजेचे साहित्य, फुले, हार खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया" च्या गजरात बाप्पाला घरोघरी आणले जात आहे. बाप्पाच्या आगमनाने प्रत्येक नागरिकाचा चेहरा आनंदाने फुलून गेला आहे.
पावसामुळे आनंद द्विगुणित -
गणरायाच्या आगमनाच्या मुहूर्तावरच वणी परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या आगमन पावसामुळे वातावरण अतिशय प्रसन्न झाले असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.




