विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
शिंदोला : चंद्रपूर - मुकुटबन ही एसटी बस सेवा मागील काही दिवसांपासून घुग्घुस वरून चारगाव चौकी मार्गे मुकुटबन अशी वळविण्यात आल्याने घुग्घुस - कैलाशनगर - शिंदोला मार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ही बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी या मार्गावरील ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापक, चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मार्ग परिवर्तनामुळे फटका नकोडा, मुंगोली, कैलाशनगर, माथोली, साखरा, विरूर (गाडेगाव), कोलगाव शिवनी, चिंचोली, येनाडी, शेवाळा, चिखली, टाकळी, येनक, शिंदोला (माईन्स), चनाखा परमडोह, कळमना, पात्री, कुर्ली इत्यादी गावातील ग्रामस्थ, शाळेकरी विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तसेच घुग्घुस ते चंद्रपूर येथे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या परिवहन मंडळाच्या मुंगोली येथील पुलियाची समस्या लक्षात घेता पुलिया सुरू झाला असून, प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन 'चंद्रपूर - मुकुटबन' ही बस सेवा पूर्ववत घुग्घुस - कैलाशनगर - शिंदोला मार्गे सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर आयुष ठाकरे (मुंगोली), रामचंद्र दुर्वे (मा. उपसरपंच, मुंगोली), तुळशिराम ठाकरे (मा. उपसरपंच, शिंदोला), प्रल्हाद बदखल, धनराज परागे, प्रमोद हनुमंते (मा. उपसरपंच, शिवनी) यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
परिवहन मंडळाने तात्काळ ही बस सेवा पूर्ववत मार्गाने सुरू करून ग्रामस्थ, रुग्ण व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.



