एकाच UDISE क्रमांकावर विविध ठिकाणी विद्यार्थी दाखविले जात असल्याचा आरोप; परवानग्या, निधी व शासकीय लाभांची चौकशी करण्याची मागणी
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी येथील मॅकॅरून शाळेच्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या शैक्षणिक कामकाजाबाबत प्रत्यक्ष तपासणी करून नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे यांनी जिल्हा परिषद यवतमाळच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, मॅकॅरून शाळेचा UDISE क्रमांक 27141415331 असल्याचे दिसून येते. हा क्रमांक वडगाव रोड येथील शाळेसाठी असल्याचे नमूद करताना, त्याच शाळेचे कामकाज इतर विविध ठिकाणी सुरू असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली आहे किंवा नाही, तसेच सादर करण्यात आलेला अहवाल वस्तुस्थितीवर आधारित आहे किंवा नाही, याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शाळेने जागा बदलली असल्यास जुन्या ठिकाणी शैक्षणिक कामकाज कोणत्या नियमांनुसार सुरू आहे, तसेच विविध ठिकाणी सुरू असलेल्या शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एकाच UDISE क्रमांकावर विविध ठिकाणी विद्यार्थी दाखविले जात आहेत का, तसेच त्यानुसार शासनाकडून कोणतेही अनुदान अथवा शासकीय लाभ घेण्यात आले आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची संख्या, UDISE नोंदणी आणि शासनाकडून मिळालेल्या निधीची पडताळणी करून तपासणीत अनियमितता आढळल्यास संबंधित संस्था व जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवीण खानझोडे यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, वणी नगर परिषद, गटशिक्षणाधिकारी तसेच संबंधित संस्थेलाही देण्यात आल्या आहेत.

