ठळक बातम्या

    आज वाडबैल... आवतन घे! उद्या जेवायला ये!! पोळ्यानिमित्त शेतकरी राजा आणि त्याच्या सर्जा-राजाचा सन्मान; बळीराजाच्या कष्टाला मानाचा मुजरा!

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शेतकऱ्याच्या जीवनात बैलजोडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर शेताच्या बांधावर, उन्हात-पावसात शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या सर्जा-राजाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे पोळा. या पारंपरिक सणानिमित्त गावोगावी आज “वाडबैल” घालत शेतकरी आपल्या लाडक्या बैलांना प्रेमाने आवतन देत आहे.

    “आज वाडबैल... आज आवतन घे, उद्या जेवायला ये” या आपुलकीच्या शब्दांतून शेतकरी आणि त्याच्या बैलांमधील जिव्हाळ्याचे नाते अनुभवायला मिळते. बैलांना सजवणे, त्यांची पूजा करणे, गोडधोड खाऊ घालणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे.

    पोळा हा केवळ बैलांचा सण नसून शेतकरी राजा, त्याची मेहनत आणि मातीतल्या संस्कृतीचा गौरव करणारा सण आहे. शेतीच्या प्रत्येक हंगामात साथ देणाऱ्या बैलांच्या कष्टामुळेच शेतकऱ्याच्या शेतात हिरवाई फुलते. त्यामुळे पोळ्याच्या निमित्ताने बळीराजाच्या अथक परिश्रमालाही मानाचा मुजरा केला जातो.

    सर्जा-राजाच्या गळ्यात घुंगरांचा नाद, अंगावर रंगीबेरंगी सजावट आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य... अशा उत्साही वातावरणात यंदाचा पोळा सण साजरा होत आहे.

    मातीशी नातं, बैलांशी माया आणि कष्टावर विश्वास... हाच खरा शेतकरी राजा!

    पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना आणि सर्जा-राजाला मनःपूर्वक शुभेच्छा! 

    Photo