समाजहितासाठी सदैव पुढाकार घेणाऱ्या खेतानी परिवाराने पुन्हा एकदा आपली दानशूर परंपरा कायम ठेवत पांढरकवडा येथील श्री गोरक्षण संस्थान व श्री दत्त मंदिर देवस्थान ला मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. ज्येष्ठ नागरिक श्री अकबर सेठ खेतानी, त्यांच्या पत्नी श्रीमती नूरजहा अकबर अली खेतानी आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच खेतानी फाउंडेशन चे प्रमुख श्री सलीमजी खेतानी यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांच्या वतीने रु. ५ लाखांची उदार देणगी संस्थेला दिली.
ही देणगी नवीन गोरक्षण शेड व इमारत बांधणीसाठी वापरली जाणार असून, या महत्त्वपूर्ण योगदानामुळे गोरक्षण संस्थेच्या विकास कार्याला नवे बळ मिळाले आहे.
या उदार दानाबद्दल श्री गोरक्षण संस्थान व श्री दत्त मंदिर देवस्थान तर्फे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, नगरातील मान्यवर नागरिक, धर्मप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
