सोशल मीडियाचा गैरवापर करून धार्मिक भावना भडकावणाऱ्या एका प्रकाराचा पर्दाफाश करत पुसद पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फेक आयडी तयार करून छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या प्रकरणात सुरुवातीला एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सखोल तपासानंतर खरा आरोपी दुसराच असल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पुसद शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पुसद शहर पोलीस ठाण्यात अप.क्र. ६३/२०२५, कलम २९९ (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक तपासात एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या नावाने इन्स्टाग्रामवरून आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
