विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : महाराष्ट्रातील शेतकरी व सामाजिक चळवळीतील नामवंत दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने वणी येथे होणारा ‘महाएल्गार शेतकरी मेळावा’ राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. नागपूर येथे पार पडलेल्या महाएल्गार शेतकरी मोर्चाच्या यशानंतर शेतकरी वर्गात निर्माण झालेल्या नवचैतन्याच्या पार्श्वभूमीवर वणीतील शेतकरी, विविध शेतकरी संघटना, किसान सभा व प्रहार संघटनेच्या पुढाकारातून या ऐतिहासिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास माजी मंत्री बच्चू कडू, शेतकरी नेते एड. वामनराव चटप, प्रकाश पोहरे, डॉ. अजित नवले, माजी खासदार राजू शेट्टी, कॉ. राजन क्षिरसागर, महादेव जानकर, रघुनाथदादा पाटील, अनिल घनवट, मनोज जरांगे पाटील, रविकांत तुपक्कर, यांच्यासह महाराष्ट्रातील विविध सामाजिक व शेतकरी संघटनांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
उबघाईस आलेली शेतीव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सद्यस्थितीतील राजकारण यावर या मेळाव्यात अभ्यासपूर्ण चर्चा होणार असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. कर्जमाफी, शेतमालाला रास्त भाव, कृषिपंप वीजपुरवठा, पीकविमा, धरणे व पाणी प्रश्न, नैसर्गिक आपत्ती, शेतकरी आत्महत्या, शिक्षण व्यवस्था, वाहतूक धोरण तसेच फेरपीक पाहणी आदी ज्वलंत विषयांवर सखोल मंथन होणार आहे.
हा ‘महाएल्गार शेतकरी मेळावा’
दिनांक ४ जानेवारी २०२६, दुपारी १२.०० वाजता,
वणी येथील शासकीय मैदान (पाण्याच्या टाकीजवळ) येथे आयोजित करण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून शेतमालाला योग्य दर न मिळणे, कर्जाचा वाढता डोंगर, यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि शासनस्तरावरून अपेक्षित आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या मनातील उद्रेक या मेळाव्याच्या निमित्ताने चव्हाट्यावर येणार आहे. त्यामुळे शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाएल्गार शेतकरी मेळावा आयोजन समितीच्या वतीने वणी तालुक्यासह झरी, मारेगाव, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजूरा, कोरपना आदी तालुक्यांतील शेतकरी व जनसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती आयोजक समितीचे श्री. सतीश देरकर, कॉ. अनिल घाटे, देवरावजी पा. धांडे, दशरथ पाटील, मुबिनभाई शेख, रघुवीर कारेकर, सैय्यद अहमद, अनिल गोवारदिपे, कॉ. उलमाले सर यांनी शेतकरी संघटना, किसान सभा व प्रहार संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील विविध क्षेत्रांतील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने हा मेळावा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळातही या मेळाव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


