विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : भारताच्या दैदिप्यमान भूतकाळाचा वारसा जपत वर्तमानातील समस्यांची सोडवून करीत भविष्यासाठी स्वाभिमान युक्त अधिष्ठान निर्माण करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मूळ उद्दिष्ट आहे. संस्कार आणि चारित्र्यांनी संपन्न पिढी घडविण्यासाठी केवळ व्यक्तिगतच नव्हे तर सामाजिक उत्थानाची भूमिका या संकल्पनेचा आधार आहे." असे विचार मारेगाव येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय मारेगाव महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ .नामदेव पवार यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येत असलेल्या माझ गाव माझ्या वक्ता ! या वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यान मालिकेचे ५२ वे पुष्प गुंफतांना ते अभिव्यक्त होत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे कोषाध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड तथा आयोजक म्हणून विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सचिव डॉ अभिजित अणे आणि ज्येष्ठ सदस्य अशोक सोनटक्के उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आरंभी विजय गंधेवार यांनी सत्यम शिवम सुंदरा हे गीत सादर केले.
आपल्या अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील निवेचनांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित कौशल्य धोरण, यात राजकारण नाही तर इस्रो चे निर्देशका समान राष्ट्रचिंतकांच्या भूमिकेतून हे धोरण तयार झाले आहे, वेद उपनिषदांमध्ये असणारी सामुहिक उत्थानाची भूमिका, जीवनदृष्टी, सिद्धांत आणि ज्ञानपरंपरा हे या धोरणाचे तीन पैलू, विद्यार्थ्यांच्या समोर भारतीय आदर्श ठेवण्याची भूमिका इत्यादींचे विवेचन करून प्राचीन भारतामध्ये विज्ञानाची किती प्रगती झाली होती हे त्यांनी विविध उदाहरणांच्या द्वारे स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपल्या भारतीयत्वाबद्दल अभिमान निर्माण करीत, भारताच्या प्रश्नांवर भारताची उत्तरे शोधणारी पिढी निर्माण करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे विद्यावाचस्पती प्रा स्वानंद पुंड यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि.सा.संघ वणी चे सचिव डॉ अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, राम मेंगावार, प्रमोद लोणारे कल्पना राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
