विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : "सध्याच्या काळात जागतिक स्तरावर प्रत्येकच क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत आहे. प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र या स्पर्धेला घाबरून न जाता आत्मविश्वासपूर्वक कौशल्य विकास करून या स्पर्धेसाठी स्वतःला पात्र करणे ही विद्यार्थ्यांची आणि त्यांना त्यासाठी प्रोत्साहन आणि सहकार्य देणे ही प्राध्यापक व विद्यापीठाची जबाबदारी आहे. विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त होत असलेल्या यशामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वाटा फार मोठा असल्याने आपल्यातील न्यूनगंड बाजूला सारत, विविध कौशल्य आत्मसात करीत, सक्षम व्यक्तिमत्त्व आणि सुयोग्य नागरिक होण्यासाठी प्रयत्न करायला हवे." असे प्रेरक विचार संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी व्यक्त केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे संगीत कला आणि सांस्कृतिक कक्ष समन्वयकांच्या आणि युवा महोत्सव चमू व्यवस्थापकांच्या एक दिवसीय कार्यशाळेत उद्घाटक स्वरूपात ते व्यक्त होत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक नरेंद्र ठाकरे, विद्यापीठाच्या विद्वत् अधिसभेचे सदस्य गजानन कासावार, कार्यशाळेतील सत्राचे मार्गदर्शक डॉ. राहुल एकबोटे, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा औषधी निर्माण शास्त्र विभागाचे प्राचार्य डॉ. सुधाकर रेड्डी हे मान्यवर उपस्थित होते.
१६ महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतलेल्या या कार्यशाळेच्या आरंभी विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत आणि स्वागत गीत सादर केले.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालयातील विविध विभागांच्याद्वारे निर्माण करण्यात येत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा परिचय करून देत, गाडीमधील गियर आणि एक्सिलेटर म्हणजे क्षमता आणि अभिव्यक्ती यांचा सुयोग्य समतोल ज्यांच्या नेतृत्वात विद्यापीठात घडत आहे त्या कुलगुरूंचा परिचय करून दिला.
आपल्या उद्घाटकीय उद्बोधनात माननीय कुलगुरूंनी चार भिंतींच्या वर्गाची कक्षा ओलांडून जीवनात आवश्यक कौशल्यांच्या प्राप्तीचे महत्त्व सांगत, विद्यापीठात विविध स्तरांवर प्राप्त होत असलेल्या यशाचे गुणगान करीत, कौशल्य पातळीतील बदल किती आवश्यक आहेत? ते अधोरेखित केले. भविष्यकाळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून त्याचा धसका न घेता ते कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे यासाठी पाचव्या सत्रात विशेष योजना करीत असल्याचे देखील स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आणि विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा उल्लेख करीत विद्यार्थ्यांच्या यशासाठी महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.
या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अंजली आत्राम यांनी केले.


