ठळक बातम्या

    भाव प्रगटीकरण हे संगीताचे खरे उद्दिष्ट - डॉ. राहुल एकबोटे

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी " गीतकारांनी अभिव्यक्त केलेले आणि संगीतकारांनी फुलविलेले भाव नेमकेपणाने सादर करणे हाच संगीताचा खरा गाभा आहे. प्रत्येक गीत हे वेगळ्या अर्थाने शास्त्रीय संगीतच आहे. त्या गाण्याच्या मागे असणारे शास्त्र समजून घ्यायला हवे. अत्यंत सुप्रसिद्ध गाणे निवडण्यापेक्षा थोडे आडवाटेचे पण आपल्या क्षमतांना साजेसे गाणे निवडले तर तुमचे सादरीकरण अधिक प्रभावशाली होऊ शकते." असे विचार विदर्भातील सुप्रसिद्ध गायक, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथील प्राध्यापक तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे परीक्षक डॉ. राहुल एकबोटे यांनी व्यक्त केले. 

              संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तथा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,  संगीत कला सांस्कृतिक कक्ष समन्वयकांच्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये विशेष सत्रामध्ये ते व्यक्त होत होते.

            या कार्यक्रमाच्या सादरीकरणापूर्वी गरिमा शेजाळ आणि नीलिमा शेजाळ या भगिनींनी आणि हिमांशु कुचनकार यांनी सुर निरागस हो हे गीत तथा सतार वादनात वृंदावनी सारंग राग सादर केला.

             डॉ. राहुल एकबोटे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि उपस्थित आमच्या प्रतिसादाने संपन्न सादरीकरणाचा आरंभ श्री गणेश पुराणातील सर्व देवता कृत परब्रह्मरूपम् चिदानंदरूपम् या स्तोत्राने केला.

            शास्त्रीय संगीत देखील लोकसंगीतातूनच उगम पावले आहे असे प्रतिपादन करीत केसरीया बालमा या गुजराती, उठाई दिन या पंजाबी, तर आई उदे ग अंबाबाई या जोगव्याच्या माध्यमातून मराठी लोकसंगीतांचे सादरीकरण करीत त्यांनी त्यातील सुरावट देखील उलगडून दाखवली. 

             दिस नकळत जाई ! या सौमित्र लिखित, मिलिंद इंगळे यांच्या संगीताने युक्त, अरुण दाते यांनी अजरामर केलेल्या गीताच्या माध्यमातून शब्दांचे उच्चार कसे असायला हवेत याचा त्यांनी वस्तू पाठ सादर केला. 

            संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या माझे माहेर पंढरी ! या अभंगाच्या द्वारे माहेरची आठवण, च्या सादरीकरणाच्या वेळी आठवणींचा भाव कसा जागृत झाला पाहिजे हे सांगत त्यांनी श्रोत्यांची दाद मिळवली. 


      कबीरांची वाणी असणाऱ्या निर्गुणी भजनाला आरंभी राजस्थानी लोक संगीत स्वरूपात आणि नंतर पंडित कुमार गंधर्व यांनी केलेले बदल अशा दोन्ही गोष्टी मांडत सादरीकरणाचे शास्त्र उलगडून दाखविले. 

              लोकगीत, भावगीत, भक्तीगीत या विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील विविध विभागातील अभिव्यक्तीचे सूत्र सांगत शेवटी त्यांनी कराओके स्वरूपात, श्री राम का गुणगान करिये ! या विश्वविख्यात गाण्यांनी त्यांनी सादरीकरणाचे समापन केले. 

            यानंतरच्या सत्रामध्ये विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ. राजीव बोरकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी पाठविलेल्या पीपीटीच्या आधारे महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास विभाग संयोजक डॉ. अभिजित अणे यांनी विद्यार्थी विकास विभागाच्या द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि विद्यापीठाची युनी कनेक्ट ॲप बद्दल सविस्तर सादरीकरण केले.



    Photo