ठळक बातम्या

    माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे मुंबईत निधन; वणी विधानसभा क्षेत्रात शोककळा.. दीर्घ आजाराने लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास; राजकीय व सामाजिक क्षेत्रात अपूरणीय पोकळी

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना नेते विश्वास रामचंद्र नांदेकर (विश्वासभाऊ) यांचे रविवारी रात्री मुंबईतील लिलावती रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते दीर्घ काळापासून आजारी होते व उपचार घेत होते. दिं. २१ रविवारी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वणी तालुका व संपूर्ण विधानसभा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

    विश्वास नांदेकर हे मितभाषी, अभ्यासू आणि जनतेशी थेट संवाद साधणारे लोकनेते म्हणून परिचित होते. आमदार म्हणून कार्यकाळात त्यांनी वणी विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच अग्रभागी राहिले.

    राजकीय जीवनासोबतच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विविध सामाजिक उपक्रम, संस्था व चळवळींना त्यांनी वेळोवेळी पाठबळ दिले. त्यामुळे पक्षभेद विसरून सर्व स्तरातून त्यांच्याबद्दल आदराची भावना होती.

    त्यांच्या निधनावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध संघटनांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. वणी शहरासह ग्रामीण भागात शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

    माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या निधनाने वणी विधानसभा मतदारसंघाने एक अनुभवी, जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारा नेता गमावला असून ही पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

    विदर्भ वार्ता | पत्र परिवारा कडून भावपूर्ण श्रध्दांजली

    Photo