ठळक बातम्या

    वणी तालुक्यात शिक्षकांचा तीव्र तुटवडा; 118 पदे रिक्त, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

     वणी : वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अपरिहार्य ठरेल, अशी गंभीर बाब जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

    वणी तालुक्यात एकूण 408 शिक्षकांची पदे मंजूर असून प्रत्यक्षात केवळ 314 शिक्षक कार्यरत आहेत. तब्बल 118 पदे रिक्त असून मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यरत असलेले 22 प्रशिक्षणार्थी शिक्षक 30 नोव्हेंबर 2025 रोजी प्रशिक्षण पूर्ण झाल्याने कार्यमुक्त झाले आहेत. परिणामी अनेक शाळांमध्ये अध्यापन व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे.

    विशेषतः खाणबाधित व दुर्गम भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून तालुक्यातील 10 केंद्रांतील 24 गावांमध्ये इयत्ता 1 ते 5 व 6 ते 8 साठी एकही शिक्षक उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जुनाडा, लाठी, पिंपळगाव, महाकालपूर, निलजई, नवेगाव, सावंगी नवीन, आमलोन, चेंडकापूर, बोदाड, कुंभारखणी, चनाखा, कळमना बु., पाथरी, शेवाळा, शिदोला माईन्स, टाकळी, वारगाव जुना, मुंगोली, साखरा को., पोहणा, डोर्ली, केशवनगर व कुरई या गावांमधील विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण धोक्यात आले आहे.

    ग्रामीण व शेतमजूर कुटुंबातील मुलांचा शिक्षणाचा पाया प्राथमिक स्तरावरच मजबूत होणे गरजेचे असताना शिक्षकांच्या अभावामुळे एका शिक्षकावर अनेक वर्गांचा भार येत आहे. याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे.

    वणी तालुका खनिज संपदेने समृद्ध असून जिल्ह्याला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खनिज विकास निधी प्राप्त होतो. त्यामुळे खाणबाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी या निधीचा वापर करून तातडीने शिक्षकांची भरती करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

    जानेवारी ते एप्रिल हा कालावधी परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या काळात शिक्षक उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल. याबाबत पालकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

    Photo