ठळक बातम्या

    वंदेमातरम् आम्हाला वेदमंत्राहून वंद्य आहे. चंद्रशेखर अभ्यंकर


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

     वणी : आजवर सर्व क्रांतीकारकांना बळ देणारे वंदे मातरम् या दोन शब्दासाठी हसत हसत फासावर जाण्यासाठी तयार असलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील सैनिकांसाठी  व आजही आमच्यासाठी वंदे मातरम् हे 'वेदमंत्राहुन  वंद्य आहे असे प्रतिपादन विरार ( मुंबई) येथील प्रसिद्ध वक्ते चंद्रशेखर अभ्यंकर यांनी केले. ते नगर वाचनालय द्वारा आयोजित हेमंत व्याख्यानमालेचे 38 व्या वर्षातील  सार्धशती वंदे मातरम् या विषयावर पहिले पुष्प गुंफताना बोलत होते. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विदर्भ साहित्य संघ वणी शाखेतर्फे प्रायोजित करण्यात आले होते. 

            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय निळकंठराव देरकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह दीपक नवले , विदर्भ साहित्य संघाचे वणी शाखेचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोने हे होते. व्यासपीठावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोदकुरवार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सोनाली क्षिरसागर यांच्या स्वागत गीताने झाली. 

                आपला विषय मांडताना ते पुढे म्हणाले की, जगात आजवर कोणताही देश आपल्या देशाला "माता" म्हणत नाही पण आपण मात्र आपल्या भारताला भारतमाता असेच गौरवाने म्हणत असतो. केवळ भारत देशातच देशाला 'भारतमाता ' असे संबोधित केले असून भूमातेला वंदन आपल्या भारतीय संस्कृतीत केले आहे. त्याचे प्रतिबिंब वंदे मातरम्  या गीतात दिसतात.  बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1870  च्या दशकात रचलेले वंदे मातरम् हे गीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक असलेले संस्कृत प्रचुर देशभक्तीपर गीत त्यांच्या 'आनंदमठ' कादंबरीत समाविष्ट आहे. हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी 1896  मध्ये पहिल्यांदा गायले आणि 1950. मध्ये भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले गेले. जे मातृभूमीला वंदन करणारे आणि देशभक्ती जागवणारे प्रभावी माध्यम आहे. 'वंदे मातरम' ह्या शब्दांनी भारतीयांच्या मनावर राज्य केलं. स्वातंत्र्य लढयात 'वंदे मातरम' ह्या दोन शब्दांनी व गीतानं महत्त्वाची भूमिका बजावली. हे शब्द वेद मंत्रांहूनही पवित्र मानून अनेक क्रांतीकारक हसत हसत फासावर गेले. याचे स्मरण करून चंद्रशेखर अभ्यंकर यांनी वंदे मातरम् या गीताचा भावार्थ त्यांच्या रसाळ वाणीने श्रोत्यांना सांगितला. विविध दाखले व गीत गात त्यांनी आपला विषय उलगडला 

    अध्यक्षीय भाषण करताना संजय देरकर म्हणाले की,  एखादी कविता एक अलौकिक तेज घेऊन जन्माला येते आणि आपल्या प्रभेने पुनःपुन्हा ती सारी धरती उजळवून टाकते. 'वंदे मातरम्' हे गीत राष्ट्रभक्तीचे स्फुरण जागविणारे आहे. 

         या प्रसंगी चंद्रशेखर अभ्यंकर यांचा व आमदार संजय देरकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार येथील संस्कार भारती शाखेतर्फे करण्यात आला. त्यानंतर विदर्भ साहित्य संघाचे वतीने नवनिर्वाचित नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन विसा संघाचे सचिव अभिजित अणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे संचालक हरिहर भागवत, विशाल झाडे, अनिल जयस्वाल, अर्जुन उरकुडे, प्राची पाथ्रडकर, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार,कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.

    Photo