विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही स्वरूपातील आपत्तींच्या वेळी गोंधळून न जाता त्यावर कशी उपाययोजना करावी यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने, माहिती आणि प्रात्यक्षिक स्वरूपातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्यासह, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सहसचिव अशोक सोनटक्के, वणी येथील उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समूहाचे प्रमोद मिश्रा, ब्रिजेश जयस्वाल, सतीश मून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे, औषधी निर्माण शास्त्र विभागाचे डॉ. सुधाकर रेड्डी, डॉ. नीलिमा दवणे, डॉ. विकास जुनगरी तथा प्रा. किसन घोगरे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांनी कार्यशाळेची आवश्यकता व स्वरूप विशद केले.
प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांनी मनोगतामध्ये प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातील फरक स्पष्ट करीत अचानक येणाऱ्या आपत्तीमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवून इतरांना सहकार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले यांनी राष्ट्रीय व्यवस्थापनाच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरापासून ग्रामीण स्तरापर्यंत निर्माण केलेल्या व्यवस्थेबाबत माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी अशा उपक्रमांच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यानंतर प्रमोद मिश्रा आणि ज्यांच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ०५ बी. एन.एन. डी. आर. एफ नागपूर चमूच्या माध्यमातून विविध विषयावरील कृत्रिम श्वासोच्छ्वास, स्ट्रेचर निर्मिती, पुरात वाचविण्याचे विविध प्रकार, सिलेंडरच्या आगीचे नियंत्रण, आग लागल्यानंतर लोकांना खाली उतरवणे इ. विविध विषयातील प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास जुनगरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. किसन घोगरे यांनी केले.



