विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : वेकोली वणी एरियातील पैनगंगा, मुंगोली व कोलगाव खाणींमधून सुरू असलेल्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतपिकांवर मोठ्या प्रमाणात कोळसा धूळ साचून शेतकऱ्यांचे गंभीर आर्थिक नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
या धूळ प्रदूषणाबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने, आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले. डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या रस्ता रोको आंदोलनानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते. तसेच 9 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे धूळ प्रदूषण समितीची बैठकही झाली. मात्र आजपर्यंत हंगाम 2023-24, 2024-25 व 2025-26 या तीन हंगामांचे शेतपिक सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर नाईलाजाने 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून खांदला फाटा येथे कोळसा वाहतुकीविरोधात बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन पूर्णतः लोकशाही मार्गाने असून प्रशासन, शासन व वेकोलीचे लक्ष वेधून प्रश्न सोडविणे हा यामागील उद्देश असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरपंच हेमंत गौरकर व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पुढील मागण्या मांडल्या आहेत—
1. कुर्ली, आबई, बोरगाव, खांदला, शिरपूर व चारगाव रस्त्यालगतच्या शेतपिकांचे तीन हंगामांचे सर्वेक्षण करून वेकोलीकडून नुकसानभरपाई देणे.
2. धूळ प्रदूषणामुळे बाधित नागरिक व पशुधनाची आरोग्य तपासणी व उपचार करणे.
3. प्रदूषणामुळे दूषित झालेल्या वैरणीऐवजी वेकोलीने चाऱ्याचा पुरवठा करणे.
4. शिरपूर ते आबई फाटा–शिंदोला हा नादुरुस्त राज्य मार्ग नूतनीकरण करणे.
5. आबई फाटा ते ढाकोरी बोरी–कोरपना राज्य मार्गाची तातडीने दुरुस्ती करणे.
या आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलनासोबत ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने प्रदूषण व शेतपिक नुकसानीची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.

