ठळक बातम्या

    संत साहित्य हे सामाजिक स्थैर्याचे अधिष्ठान - डॉ. रामदास चवरे

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी: " मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होते संत साहित्याचा मोलाचा वाटा आहे. संत साहित्य हाच समाजातील स्थैर्याचा आधार आहे. विविध संतांच्या साहित्यामध्ये वैचारिकदृष्ट्या एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची समानता अभ्यासता येते. मात्र आपल्या व्यक्तिगत काही तत्कालिक स्वार्थासाठी संदर्भहीन स्वरूपात संत साहित्य तोडून मोडून वापरणे हा अक्षम्य अपराध आहे." असे विचार सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांनी व्यक्त केले.

              विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या ७२ व्या वर्धापनदिनी, नगर वाचनालय वणीच्या संयुक्त विद्यमाने प्रति महिन्यात आयोजित होत असलेल्या माझ गाव माझा वक्ता ! या आगळ्यावेगळ्या व्याख्यानमालेतील ५३ वे पुष्प गुंफतांना कवितेच्या अनुषंगाने या विषयावर ते व्यक्त होत होते.

            याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ दिलीप अलोणे तथा नगर वाचनालय वणीचे सचिव गजानन कासावार उपस्थित होते. 

             कार्यक्रमाच्या आरंभी वंदे मातरम् च्या सार्थशती निमित्ताने विजय गंधेवार यांनी वंदे मातरम् चे गायन केले.

            प्रास्ताविकामध्ये गजानन कासावार यांनी विदर्भ साहित्य संघ वणी शाखेच्या इतिहासावर प्रकाश टाकत सध्या प्रचलित असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.

            प्रमुख वक्त्यांनी, कवी हा वेडा नसतो तर तो ध्येयवेडा असतो असे म्हणत सर्व वाद बाजूला ठेवून कविता हा जगण्याचा विषय आहे हे विशेषत्वाने प्रतिपादन केले. कविता निर्मिती आणि कवितेचा आस्वाद या वेगवेगळ्या प्रक्रिया असल्या तरी त्या परस्पर पूरक आहे असे म्हणत कविता हा सत्य स्वरूपातील आत्मकथनाचा अविष्कार असायला हवा यावर भर दिला. 

           अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. दिलीप अलोणे यांनी कविता आस्वादक स्वरूपामध्ये अनुभवाचा विषय व्हायला हवी असे मत मांडले. 

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सचिव डॉ अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, राम मेंगावार, प्रमोद लोणारे आणि कल्पना राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

    Photo