ठळक बातम्या

    वणी नगरपरिषदेच्या सहाही विषय समित्यांचे सभापती जाहीर; स्थायी समिती अध्यक्षपदी विद्या आत्राम



    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

     वणी : वणी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर विषय समित्यांचे सभापती पद कोणाला मिळणार, याबाबत शहरात मोठी उत्सुकता होती. अखेर दिं. १६ जाने शुक्रवारी नगरपरिषदेच्या सर्व सहाही विषय समित्यांचे सभापती, उपसभापती तसेच स्थायी समितीचे सदस्य अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.

    ही निवड प्रक्रिया उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात पार पडली. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शहर अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, नगराध्यक्षा विद्या खेमराज आत्राम, गटनेते व उपाध्यक्ष राकेश बुगेवार यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

    नगरपरिषदेच्या विषय समित्यांचे सभापती पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत. 

    सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी लवलेश लाल, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी लक्ष्मण उरकुडे, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी अनिल चिंडालिया यांची निवड झाली आहे. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी सोनाली प्रशांत निमकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी रीता महेश पहापळे, तर पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून उपाध्यक्ष राकेश बुगेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी मनिषा गव्हाणे यांची निवड झाली आहे.

    स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा विद्या खेमराज आत्राम यांची निवड करण्यात आली असून, सदस्य म्हणून लवलेश लाल, लक्ष्मण उरकुडे, राकेश बुगेवार, अनिल चिंडालिया, सोनाली निमकर, रीता पहापळे, आरती वांढरे व राजू भोंगळे यांचा समावेश आहे.

    सदर सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ पुढील एक वर्षासाठी राहणार असून, त्यानंतर उर्वरित नगरसेवकांना सभापतीपदाची संधी देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.








    नियुक्त झालेल्या सर्व सभापती, उपसभापती व स्थायी समिती सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्यकाळात शहर विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    ........................................................................................... 


    Photo