ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड. पूजा बांदुरकर, देवाण पारखी करणार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व.

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरांवर आयोजित होत असलेल्या आविष्कार २०२५ स्पर्धेत लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी चे विद्यार्थी जिल्हास्तरीय निवड फेरीत यशस्वी झाल्यानंतर विद्यापीठस्तरीय स्पर्धेमध्ये हेमंत मालेकर, कुमकुम झाडे, तूबा खान, पूजा बांदूरकर, देवेन पारखी, लौकिता देठे, मंजुळा चिकनकर, विनीत पोयाम व सुशील यादव या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला होता.    

              विद्यापीठस्तरीय दुसऱ्या फेरीची ची स्पर्धा ही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती च्या भौतिक शास्त्र विभागात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये कु पूजा बांदूरकर आणि देवाण पारखी या विद्यार्थ्यांनी प्युअर सायन्स या विभागात तृतीय क्रमांक प्राप्त करीत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपले स्थान निश्चित केले . सोबतच या वर्षीचा विद्यापीठाचा कलर कोट प्राप्त विद्यार्थी म्हणून नामांकन मिळवले. या विद्यार्थ्यांनी “स्मार्ट सोलार पोझिशनिंग सिस्टम: पीक पॉवर जनरेशनसाठी या शीर्षकाची प्रतिकृती सादर केली. ही एक अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा आहे जी पारंपारिक सोलर पॅनेल्सची कार्यक्षमता ५०% पेक्षा जास्त वाढवते. यामध्ये वापरलेले 'इंटेलिजंट अल्गोरिदम' सूर्याच्या हालचालीचा अचूक मागोवा घेऊन पॅनेलला नेहमी योग्य दिशेला ठेवतात, ज्यामुळे ऊर्जेचा अपव्यय टाळला जातो. ही सिस्टम केवळ सूर्याचा थेट प्रकाशच नव्हे, तर जमिनीवरून परावर्तित होणारी ऊर्जा देखील शोषून घेण्यासाठी डिझाइन केलेली आहे. तसेच, पॅनेलवर धूळ साचू नये यासाठी यात एक विशेष 'सेल्फ-क्लीनिंग' यंत्रणा बसवली आहे, जी मानवी मदतीशिवाय कार्य करते. कमी जागेत जास्तीत जास्त वीज निर्मिती आणि 'झिरो मेंटेनन्स' हे या प्रोजेक्टचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या यशाने विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला नवे बळ मिळाले असून, आता राज्यस्तरावर प्रकल्प सादर करण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. 

    महाविद्यालयाद्वारे या स्पर्धेत सहभागी अन्य विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतींमध्ये झाडांच्या पर्यावरणपूरक कुंड्या, शोभेच्या वस्तू, आंधळ्यांसाठी सिग्नल देणारी काठी, झाडांना स्वयंचलित पद्धतीने पाणी देण्याचे तंत्र, शेतातील झाडांच्या टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले बायो एन्झाईम व त्यापासून नैसर्गिक शाम्पू, साबण, हॅन्डवॉश, आरोग्यविषयक माहिती साठवणारे ऑनलाइन ॲप्लिकेशन व मार्केटिंगसंबंधी प्रतिकृतीही सादर करण्यात आल्या.

          या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, समन्वयक डॉ. अजय राजूरकर, सहयोगी डॉ. आदित्य शेंडे व डॉ. संघदीप उके तसेच महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मत्ते यांचे देखील विशेष मार्गदर्शन लाभले. तांत्रिक बाबींमध्ये मनोज सरमोकदम व मनीष पेटकर यांनी सहकार्य केले. 

    शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया तथा सर्व संचालक गण,प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून राज्यस्तरावर देखील यश संपादन करावे, अशा शुभकामना प्रदान केल्या.

    Photo