विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : सावित्री–जिजाऊ दशरात्रोत्सवानिमित्त वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्था, मराठा सेवा संघ आणि छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम या सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील अग्रेसर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक भवन, वणी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जिजाऊ वंदनेने या शिबिराचा विधिवत शुभारंभ करण्यात आला.
या शिबिरात तब्बल ५१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले. विशेष म्हणजे महिला रक्तदात्यांचा सहभाग लक्षणीय असून त्यांनी समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले.
शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने रक्तसंकलनाची जबाबदारी सांभाळली. यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तसेच आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ, केळी व ज्युस देऊन रक्तदात्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनोजे कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष मंगेश रासेकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचे सचिव मंगेश खामनकर यांच्यासह अरुण डवरे, विनोद बोबडे, नगरसेवक अजय धोबे, मारोती जिवतोडे, अमोल टोंगे, अभय पानघाटे, सचिन ढोके, संजय जेऊरकर, दत्ता पुलेनवार, कवडू नागपूरे, रवि चांदणे, जीवन चौधरी, सुभाष गेडाम, बबन यादव, नितीन आवारी, सोनाली जेणेकर, पल्लवी वागदरकर, आशा कोवे, पल्लवी सुर, योगिता गोहोकर, निशा खामनकर आदींनी अथक परिश्रम घेतले.
सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून सावित्री–जिजाऊ दशरात्रोत्सव अधिक अर्थपूर्ण ठरल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.





