विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी शहरात सुरू असलेल्या सुगंधी तंबाखू तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन तब्बल महिनाभर उलटूनही आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई न होणे ही बाब पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेचा कळस असल्याचे चित्र समोर आले आहे. आरोपी खुलेआम शहरात फिरत असताना पोलीस यंत्रणा मात्र मूकदर्शक बनली असल्याचा गंभीर आरोप युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी केला आहे.
या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना पाठविण्यात आलेल्या अंतिम स्मरणपत्रात शेंडे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला असून, येत्या ७ दिवसांत आरोपींना अटक व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त न केल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी वणी तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन छेडले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
तक्रारीनुसार दिनांक ०८ डिसेंबर २०२५ पासून आरोपी मोकाट असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. विशेष म्हणजे तस्करीसाठी वापरण्यात आलेले MH-24-BL-7051 क्रमांकाचे वाहन अद्याप जप्त न होणे ही गंभीर बाब असून, यामागे कुणाचा आशीर्वाद आहे का? असा थेट सवाल शेंडे यांनी उपस्थित केला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू असल्याचा अहवाल सादर केला असला तरी प्रत्यक्षात तो केवळ कागदोपत्री तपास असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जाणूनबुजून तपासात दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, अन्यथा हा विषय रस्त्यावर नेला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जर प्रशासनाने या गंभीर तस्करी प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर येणाऱ्या काळात वणी शहरात जनआक्रोश उसळण्याची शक्यता असून, त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील, असेही शेंडे यांनी ठामपणे सांगितले.
या निवेदनाची प्रत आमदार संजयजी देरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती विभाग), जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यासह संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे

