विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. करमसिंग रामसिंग राजपूत यांची शिवाजी शिक्षण संस्थेतील पुंडलिक महाराज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदुरा रेल्वे जि. बुलढाणा येथे प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल हृद्य सत्कार आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक नरेंद्र ठाकरे, उमापती कुचनकर तथा प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये प्रा. सतीश पोटे यांनी राजपूत यांच्या कार्य तत्परतेवर प्रकाश टाकत कनिष्ठ महाविद्यालय आणि मुक्त विद्यापीठात त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा उल्लेख केला.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने राजू आगलावे यांनी आपल्याला असे गुरु मिळाल्याचा अभिमान व्यक्त केला तर कनिष्ठ महाविद्यालयाची प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांनी शून्यातून निर्माण झालेल्या राजपूत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला.
वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ. अभिजित अणे यांनी आपल्या भाऊक मनोगतात एक मित्र दुरावत असल्याची खंत व्यक्त करीत राजपूत यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
उस्फूर्त स्वरूपातील मनोगतात मध्ये डॉ मनोज जंत्रे, डॉ. रेखा बडोदेकर, डॉ. विकास जुनगरी यांनी डॉ.राजपूत यांच्या विविध वैशिष्ट्यांना अधोरेखित केले.
प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी, कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना डॉ.राजपूत यांनी मिळवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपलब्धीचे महत्त्व स्पष्ट करीत महाविद्यालयाच्या व्यवस्थापन कार्यात त्यांच्या योगदानाचा गौरव केला. शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या विशाल संस्थेत तेथील अनेक जण उपलब्ध असताना यांची झालेली निवड ही कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे हे विशेषत्वाने अधोरेखित केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक उमापती कुचनकर, नरेंद्र ठाकरे ,अशोक सोनटक्के आणि सुभाषराव देशमुख यांनी राजपूत यांच्या भावी कार्यासाठी शुभकामना प्रदान केल्या.
सर्व संचालक गणांच्या तथा लोकमान्य पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था आणि कर्मचारी कल्याण निधी यांच्यावतीने डॉ. राजपूत यांचा सत्कार करण्यात आला तर डॉ. रेखा बडोदेकर यांनी सौ. भारती राजपूत यांचा सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. करम सिंग राजपूत यांनी रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्या पासून प्राचार्य पदापर्यंतच्या आपल्या जीवनातील चढता आलेख उलगडून दाखविला. जीवनामध्ये शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कार्याचा उपस्थित त्यांना परिचय करून दिला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात संस्थेत घेतलेल्या ५२ लोकांच्या अभिमानास्पद निवडीचा उल्लेख करीत त्यातील तब्बल आठ लोक प्राचार्य पदावर आरूढ झाल्याचा आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विद्याधर कोडवते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.


