विदर्भ वार्ता|प्रतिनिधीवणी : राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धा व सर्वसंत स्मृती समारोहाच्या निमित्ताने ब्रह्मलीन व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७व्या पुण्यस्मरण सोहळ्याची वणीत आज (दि. २३ जानेवारी २०२६) पहाटेपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. विठ्ठलवाडी, वणी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित या तीनदिवसीय कार्यक्रमांतर्गत सकाळी ७ वाजता रामधून व ग्रंथदिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा गुरुदेव सेवा मंडळ, विठ्ठलवाडी (मुख्य शाखा) व श्री गुरुदेव सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, विठ्ठलवाडी वणी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वाजता घटस्थापना, सामुदायिक ध्यान, ग्रामगीता वाचन व चिंतनानंतर रामधून-ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. रामनामाच्या घोषात व ग्रामगीतेच्या संदेशांनी परिसर भारावून गेला.
ग्रंथदिंडीमध्ये ग्रामगीता, संतवाङ्मय व राष्ट्रसंतांच्या विचारांचे दर्शन घडत असताना ग्रामस्वच्छतेचा संदेशही देण्यात आला. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यानंतर दुपारी उद्घाटन सोहळा, सायंकाळी कीर्तन, तसेच पुढील दोन दिवस ग्रामीण व राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा, सामुदायिक प्रार्थना, संतस्मृती कार्यक्रम व बक्षीस वितरणाचे आयोजन आहे.
“नांदेल ग्राम, विश्व वैभवे” या ग्रामगीतेतील विचारांनुसार समाजात मूल्याधिष्ठित परिवर्तन घडविण्याचा संकल्प या सोहळ्यातून अधोरेखित करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या भव्य आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.




















