विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : आज दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळा येनक येथे शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत असल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन गावातील सुशिक्षित नागरिक व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
शाळा सुधारक समितीचे अध्यक्ष अमोल ढवळे, अनिलभाऊ तेलग, विकास खामनकर, विकास ढवळे, अरविंद येडे, जगदीश मडावी तसेच इतर सुशिक्षित ग्रामस्थांनी बि. डी. ओ. यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शाळेस तातडीने शिक्षक उपलब्ध करून देण्याची ठोस मागणी केली.
या मागणीची दखल घेत बि. डी .ओ यांनी लवकरात लवकर शिक्षकांची कमतरता भरून काढण्याची हमी दिली आहे. त्यामुळे येनक येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे ग्रामस्थांनी आभार मानले असून, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

