ठळक बातम्या

    सिद्धी संपन्न युवा ही राष्ट्राची संपत्ती- डॉ. हरीओम पुनियानी

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : " ३५ वर्षाखालील ६५ टक्के युवकांची संख्या हे भारताचे सर्वात महत्त्वपूर्ण वैभव आहे. मात्र युवकत्व हे केवळ वयावर अवलंबून नसते तर ज्ञान, कौशल्य, चारित्र्य, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिष्ठा या गुणांनी संपन्न तोच खरा युवक. लोकनायकांसमान महापुरुषांच्या स्मृतीत स्मरण, सन्मान आणि संकल्प करीत असा युवकच राष्ट्राच्या उन्नतीचे अधिष्ठान होऊ शकतो." असे विचार नागपूर येथील हिस्लाप महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख तथा सुप्रसिद्ध प्रेरकवक्ता डॉ. हरिओम पुनियानी  यांनी व्यक्त केले.

              शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये लोकनायक बापूजी अणे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित ५६ व्या वर्षीच्या व्याख्यानपुष्पात " सक्षम युवा, सक्षम राष्ट्र " या विषयावर ते व्यक्त होत होते. 

    याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय मुकेवार, सचिन  सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक अनिल जयस्वाल, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे हे मान्यवर उपस्थित होते. 

             प्रास्ताविकामध्ये प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी व्याख्यानमालेच्या वैशिष्ट्यपूर्ण इतिहासावर प्रकाश टाकत वक्त्यांचा परिचय करून दिला.

    याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. अजय देशपांडे यांच्या संपादकत्वात ३१ विद्यार्थ्यांनी ६ विषयांवर लिखाण करीत निर्माण केलेल्या ८० पृष्ठांच्या आराधना विशेषांकाचे विमोचन करण्यात आले.

              आपल्या अत्यंत प्रभावी, संयत आणि अभ्यासपूर्ण विवेचनामध्ये डॉ. हरीओम पुनियानी यांनी, चारित्र्यरहित ज्ञान समाजावर ओझे असते तर नैतिकता विरहित कौशल्य विघातक असते. रोज किमान एका विद्यार्थ्याला प्रोत्साहित करेल असे शिक्षकी जीवन असावे. संघर्षातच जीवनाचा खरा आनंद आहे. जिथे अनेक लोक अर्ध्यातच हातातील काम सोडतात तेथे यशस्वी होणे खूप सोपे आहे. दिवसाचा आरंभ सकारात्मक विचारांनी करावा आणि आपले आयुष्य हे इतरांच्यासाठी समस्या निवारक असायला हवे. लोकसंग्रह आणि लोकसंपर्क हाच यशाचा आधार आहे. आपण पाल्याला हात धरून चालवू शकतो पण हात सोडल्याशिवाय तो पळू शकत नाही.अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण मुद्यांच्या आधारे आपले विचार उपस्थितांच्या हृदयात उतरवले. 

    अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या हस्ते सौ. वर्षा पुनियानी यांचा देखील सत्कार करण्यात आला.

            अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी जीवनात यशासाठी प्रामाणिक कर्म करायला हवे. ते कार्यच कर्तृत्व ठरते आणि त्याचाच सत्कार होत असतो असे म्हणत आज आपल्या युवकांना जागतिक पातळीवर स्थान मिळत असल्याचा आनंद व्यक्त केला.

    याप्रसंगी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विविध विषयांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी देणगीदारांच्या द्वारे प्रदान होणाऱ्या तथा अविष्कार, आव्हान इत्यादी विद्यापीठीय, महाराष्ट्र शासन आयोजित संविधान प्रश्नमंजुषा तथा शिक्षण प्रसारक मंडळ क्रिकेट करंडक इत्यादी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद हूड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा सतीश पोटे यांनी केले.



    Photo