ठळक बातम्या

    वणी तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती न मिळाल्याने संताप; प्रशासनाला निवेदन, आंदोलनाचा इशारा


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

     वणी : वणी तालुक्यात सन 2024-25 व 2025-26 या कालावधीत शासनाकडून एकूण ५,२६० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी केवळ ८६७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून तब्बल ४,३९३ घरकुलांचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. शासन निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती पुरवठा करणे बंधनकारक असताना प्रशासनाकडून रेतीची उपलब्धता करून दिली जात नसल्याने ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

    या संदर्भात युवा सेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी वणी तसेच तहसीलदार वणी यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, रेतीअभावी अनेक लाभार्थ्यांचे घरकुल अर्धवट अवस्थेत असून काही लाभार्थ्यांनी तर आपली जुनी घरे पाडून नवीन घराच्या आशेवर संसार उघड्यावर मांडला आहे. थंडी, ऊन व पावसासारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत लाभार्थी दिवस काढत आहेत.

    शासनाच्या स्पष्ट आदेशानुसार प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (घरकुल) अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना रेती विनामोबदला देणे अपेक्षित आहे. वणी तालुक्यातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेती साठा उपलब्ध असून तो शासनाच्या अखत्यारीत असल्याने स्वतंत्र परवानगीची गरज नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लाभार्थ्यांना खुल्या बाजारातून महागडी रेती खरेदी करण्यास भाग पाडले जात असून त्यामुळे गरीब लाभार्थी कर्जबाजारी होत आहेत.

    जर तातडीने मोफत रेती उपलब्ध करून दिली नाही, तर लाभार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

    हे निवेदन आयुष रोहिदास ठाकरे (युवा सेना वणी विधानसभा समन्वयक), अजिंक्य शेंडे (उपजिल्हा प्रमुख, युवा सेना), सुरेश शेंडे (शिवसेना प्रसिद्धी तालुका प्रमुख, वणी) यांच्यासह मिलिंद बावणे, अनिकेत बलकी, बंडू देवाळकर व दिनेश मालेकर यांनी दिले आहे.

    Photo