विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी शहरातील शासकीय मैदानावर रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित भव्य शेतकरी ‘महाएल्गार’ मेळावा अक्षरशः रणभूमीत बदलला. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व ग्रामीण जनतेच्या प्रचंड गर्दीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. सरकारविरोधात संतप्त भावना, हक्कांसाठीचा लढ्याचा निर्धार आणि आक्रमक घोषणांनी वणीचा महाएल्गार राज्यभर चर्चेचा विषय ठरला.
या मेळाव्यात माजी मंत्री बच्चू कडू, ज्येष्ठ शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार, आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला.
“शेतकरी तयार असेल तर जीव गेला तरी चालेल! शेतकरी सगळ्यांचे बाप आहे, हे लक्षात ठेवा!” अशा खणखणीत शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला.
आजही पूर्ण दिव्यांगांना सरकार पगार देत नाही, शेतकरी व शेतमजुरांवर अन्याय सुरूच आहे, असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले.
“शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढताना माझ्यावर ३५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले, तरीही मी मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सरकारला थेट इशारा देत बच्चू कडू म्हणाले,
“३० जूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही, तर १ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्रात एकही रेल्वेचाक फिरू देणार नाही!”
या घोषणेनंतर संपूर्ण मैदानात टाळ्यांचा व घोषणांचा प्रचंड गजर झाला.
मेळाव्यात ॲड. वामनराव चटप, राजन क्षिरसागर, अनिल हेपट, सतीश पाटील देरकर, दीपक चटप, विजय निवल, देवराव धांडे, अरुण नवले, हेमंत इसनकर, दशरथ पाटील बोबडे, मोबिन शेख, राजू भोंगळे आदी मान्यवरांनी शेतकरी प्रश्नांवर रोखठोक भूमिका मांडत सरकारच्या धोरणांवर टीका केली.
हा महाएल्गार यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे सतीश देरकर, अनिल घाटे, देवराव धांडे, दशरथ पाटील बोबडे, अनिल भाऊ गोवारदिपे, तसेच प्रहार संघटनेचे मोबिनभाई शेख व रघुवीर कारेकर यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गोहोकार यांनी केले तर आभार प्रदर्शन मोबिन शेख यांनी केले.
वणीतून पुकारलेला हा ‘महाएल्गार’ आता राज्यव्यापी लढ्याची नांदी ठरणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.









