ठळक बातम्या

    क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त डॉ. विनोदकुमार आदे यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : भारताच्या सामाजिक परिवर्तनाला दिशा देणाऱ्या, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेच्या वतीने नागपूर येथे भव्य समाजिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या गौरवपूर्ण प्रसंगी समाजासाठी आपल्या कला, साहित्य व पत्रकारितेच्या माध्यमातून मोलाचे योगदान देणारे यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंत, साहित्यिक व संपादक डॉ. विनोदकुमार आदे यांना सन २०२६ चा समाज गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

    २००८ पासून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त ‘प्रज्वलन’ या नावाने तालुका ते राज्यस्तरीय दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मारेगाव व वणी येथे डॉ. विनोदकुमार आदे यांनी सातत्याने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना मानवंदना अर्पण केली आहे. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मारेगाव व वणी येथे विविध ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक पोस्टर व रांगोळ्यांच्या माध्यमातून जनजागृती करत त्यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.

    मतदान, हुंडाबळी, व्यसनाधीनता, बेरोजगारी, देशभक्ती तसेच कोरोना यांसारख्या विषयांवर आधारित गीते तयार करून ती स्वतः सादर केली आहेत. यासोबतच त्यांनी लघुचित्रपटांची निर्मितीही केली आहे. ‘टुकार’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून ‘अजून माझा बाप काही केल्या मरत नाही’ हा कथासंग्रह, ‘बाप’ व ‘तडतडात’ हे कवितासंग्रह लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

    सध्या डॉ. विनोदकुमार आदे हे वणी न्यूज एक्सप्रेस या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत असून त्यांनी शेकडो कला आत्मसात केल्या आहेत. ते एक उत्कृष्ट ग्राफिक्स डिझायनर असून चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला, शिल्पकला, रांगोळी कला, गायन, लेखन, कविता, संगीत, गीतलेखन तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन असे अनेक गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटले आहेत. त्यांचे स्वतःचे फिल्म मेकिंग व रेकॉर्डिंग स्टुडिओ असून ‘कुमार’ नावाचा स्वतःचा ऑर्केस्ट्राही आहे.

    कला व संशोधन क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत हेसन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने त्यांना पीएच.डी. पदवी बहाल केली आहे. समाजासाठी केलेल्या या बहुआयामी व निस्वार्थ कार्याची दखल घेत यंदाचा समाज गौरव पुरस्कार डॉ. विनोदकुमार आदे यांना प्रदान करण्यात आला.

    दरम्यान, श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी दशकाचे औचित्य साधून संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा इतिहास मांडणारी ‘फुललेली बाग’ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. या स्मरणिकेमध्ये डॉ. विनोदकुमार आदे यांनी लिहिलेला ‘माझे माहेर नवरगाव’ हा लेख समाविष्ट असून, त्यामध्ये त्यांनी गावच्या आठवणी भावनिक व सविस्तरपणे मांडल्या आहेत. या लेखास समाजबांधवांकडून विशेष प्रशंसा मिळाली.

    या प्रसंगी मंचावर चंद्रपूर येथील प्रसिद्ध तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. अभिलाषाताई गावतूरे, एस.व्ही.ई.टी., नागपूरचे प्राचार्य डॉ. विजय वाढई, गोंडपिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव निकुळे, महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका व संत साहित्याच्या अभ्यासिका प्रा. डॉ. अलकाताई बी. झाडे, चंद्रपूरचे एम.डी. पॅथॉलॉजिस्ट व सामाजिक कार्यकर्ते डॉ. राकेश गावतूरे, नागपूरच्या माजी नगरसेविका सुनंदाताई नाल्हे, माळी वैभवचे कार्यकारी संपादक मनोहर चलपे तसेच श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेचे अध्यक्ष कृष्णा महादुरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला समाजबांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

    Photo