विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी ६ जानेवारी रोजी आधुनिक मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून वणी येथील शासकीय विश्रामगृहात जागृत पत्रकार संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजू धावंजेवार बोलत होते.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास जागृत पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप बेसरकर, सचिव मोहम्मद मुस्ताक यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले विचार मांडताना राजू धावंजेवार म्हणाले की, आजच्या काळात पत्रकारिता करणे अत्यंत कठीण झाले आहे. अनेकदा जीवावर उदार होऊन पत्रकारिता करावी लागते. बातमी सर्वात आधी देण्याच्या स्पर्धेत असंख्य न्यूज पोर्टल्स निर्माण झाली असली, तरीही वृत्तपत्रांचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. कारण बातमीची सत्यता तपासून, योग्य पडताळणी केल्यानंतरच ती वृत्तपत्रात प्रकाशित केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेतील बदलते स्वरूप, वाढती आव्हाने व पत्रकारांची सामाजिक जबाबदारी यावरही चर्चा झाली. यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार तथा जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धावंजेवार यांचा शाल व पुष गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संदीप बेसरकर, मोहम्मद मुस्ताक, पुरुषोत्तम नवघरे, आकाश दुबे, प्रशांत चंदनखेडे तसेच विवेक तोटेवार आदी पत्रकार उपस्थित होते.


